कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या दौऱ्यावर असून येथील जनतेला ते मोठी भेट देणार आहेत. देशातील पहिल्या वॉटर मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे काम येथून सुरू होत आहे. सुरुवातीला वॉटर मेट्रोची सेवा मर्यादित असेल, पण हळूहळू ती वाढवली जाईल. जलस्रोतांच्या उपलब्धतेमुळे ही सेवा स्वस्त आणि सुलभ होणार आहे. सुरुवातीला वॉटर मेट्रो दोन मार्गांवर चालवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोचीच्या जवळची 10 बेटे जोडणार वॉटर मेट्रोने : कोचीत देशातील पहिली वॉटर मेट्रो सुरू होत असून ही सेवा वाढवण्यात येणार आहेत. ही सेवा पूर्णपणे सुरू झाल्यावर कोचीच्या आसपासची 10 बेटे जोडली जाऊ शकतात. यामुळे त्यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुलभ होईल. ही मेट्रो बॅटरीद्वारे चालवण्यात येत आहे. बॅटरी पर्यावरणपूरक मानली गेल्या असून या मेट्रोला आधुनिक बोटी असेही संबोधले जात आहे. केरळच्या विकासात ही एक गेम चेंजर वाहतूक व्यवस्था ठरणार असल्याचे संबोधले जात आहे. कोची अनेक बेटांनी वेढलेले असून त्यापैकी 10 बेटे अतिशय महत्त्वाची आणि दाट लोकवस्तीची आहेत.
वाहतुकीसाठी मेट्रो चांगला पर्याय : वाहतुकीसाठी मेट्रो चांगला पर्याय आहे. मेट्रो ही एक शाश्वत आणि नियमित वाहतूक व्यवस्था आहे. मेट्रोची सेवा अतिशय वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती कोची मेट्रो रेल लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी सरकारने पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी वेगळ्या आणि धाडसी पर्यायाचा आग्रह धरला आहे. त्यामुळे विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केरळच्या जनतेला मिळणार गिफ्ट : मोदी सरकारने विकासासाठी धाडसी निर्णय घेतले आहेत. त्याचे उदाहरण मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराच्या रूपात पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवशीय केरळच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज 3 हजार 200 कोटींहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुवनंतपुरम, कोझिकोड आणि वर्कला शिवगिरी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासह विविध रेल्वे प्रकल्पांचीही पायाभरणी करणार आहेत. केरळमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधानांनी सोमवारी कोचीमध्ये मेगा रोड शो केला. यावेळी नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
हेही वाचा - Suicide Attack At Pakistan : पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात आत्मघाती हल्ला, पोलिसांसह 10 जण ठार