कलबुर्गी : कर्नाटक निवडणुकींची रणधुमाळी सुरू असल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप असल्याचे सांगत या निवडणुकीत वाद निर्माण केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी हे सकाळ संध्याकाळ लहान लेकरांसारखे रडत असल्याची टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रडणाऱ्या बाळासारखे रडण्याची सवय झाल्याचा हल्लाबोल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे कलबुर्गी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान काँग्रेसच्या नेत्यांनी माझा वैयक्तिक 91 वेळा अपमान केल्याचे सांगतात. मात्र पंतप्रधान मोदी काँग्रेस नेत्यांविरोधात पूर्वी वापरलेले शब्द विसरले आहेत. त्यांनी सोनिया गांधींबद्दल 'विधवा', 'इटालियन गर्ल' आणि 'राहुल गांधी हायब्रिड' असल्याच्या संज्ञा वापरल्या आहेत. आमच्या पक्षाच्या हायकमांडच्या विरोधात असे शब्द वापरले जात असले तरी आमच्यापैकी कोणीही मोदींसारखे रडत बसले नाही. आम्हाला हे राजकीय युद्ध असल्याचे माहिती आहे. तुम्ही बसून रडत राहिलात तर तुमचे काम होणार नसल्याचेही खर्गे यांनी यावेळी सांगितले.
माझ्या डोक्यावर पाऊल ठेवल्यावर ते येतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार ते मागासवर्गीय असल्यामुळे काँग्रेस नेते त्यांच्यावर टीका करत असल्याचे स्पष्ट केले. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी दलित आहे, मोदींच्याही खाली असल्याची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. माझ्या डोक्यावर पाऊल ठेवल्यावर ते तुमच्याकडे येतील, असेही खर्गे म्हणाले. काँग्रेसचे सरकार आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणतीही हमी नसल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, विरोधी पक्ष स्वाभाविकपणे पंतप्रधान मोदींवर टीका करतात. आम्ही आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली बहुतांश आश्वासने पूर्ण केली आहेत, असेही खर्गे यावेळी म्हणाले.
बजरंग दलावर घालणार बंदी : बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी माहिती दिली. जाहिरनामा समितीच्या अध्यक्षांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या प्रश्नावर आधीच स्पष्टीकरण दिले आहे. काही लोक रात्री मांसाहार करतात आणि दिवसा मांसाहार करणाऱ्यांना मारतात. लोकांमध्ये भांडणे लाऊन मते मिळवण्याची नौटंकी चांगली नाही, असेही खरगे म्हणाले. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात मांडलेल्या मुद्यांच्या अंमलबजावणीसाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला होता. यावर खर्गे यांनी आधी आमचे सरकार सत्तेवर आले पाहिजे. आम्हाला प्रश्नपत्रिका दिल्याशिवाय उत्तर कसे देणार? सत्तेत आल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Sanjay Raut Appeared In Court : कर्नाटक निवडणुकीत धडाडणार खासदार संजय राऊतांची तोफ, बेळगावात घेणार सभा