नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलाविली आहे. या बैठकीला १४ नेत्यांसह जम्मू आणि काश्मीरचे चार माजी मुख्यमंत्री उपस्थित आहेत.
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रातील नेते व जम्मू आणि काश्मीरमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक होत आहे. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा हा ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द केला होता.
हेही वाचा-अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशीचा प्रस्ताव कार्यकारणीत पारित - भाजप नेते चंद्रकांत पाटील
हे आहेत बैठकीला उपस्थित-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देशाचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल बैठकीला उपस्थित राहिले आहेत. फारुक अब्दुल्ला, गुलाब नबी आझाद, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती हे जम्मू आणि काश्मीरचे चार माजी मुख्यमंत्रीदेखील बैठकीला उपस्थित राहिले आहेत. या बैठकीसाठी कोणताही अजेंडा जाहीर करण्यात आलेला नाही. जम्मू आणि काश्मीरमधील नेत्यांनी खुल्या मनाने बैठकीला उपस्थित राहत असल्याचे यापूर्वीच म्हटले आहे.
हेही वाचा-जगात सर्वात स्वस्त 4G Phone जिओफोन नेक्स्ट 10 सप्टेंबरला होणार लाँच
गुपकर आघाडीची ही आहे भूमिका
सीपीआयचे (मार्क्सवादी) नेते मोहम्मद युसुफ तारिगामी हे सहा पक्षांची आघाडी असलेल्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशनचे (पीएजीडी) प्रवक्ते आहेत. त्यांनी बैठकीविषयी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की आम्हाला बैठकीसाठी अजेंडा देण्यात आलेला नाही. केंद्राकडून काय प्रस्ताव देण्यात येत आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही बैठकीला उपस्थित राहत आहोत. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला हेदेखील बैठकीला उपस्थित राहिले आहेत.