वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वाराणसीला 1 हजार 200 कोटी रुपयांच्या 16 अटल गृहनिर्माण योजना भेट दिल्या. याशिवाय 450 कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणीही त्यांनी केली. महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधानांनी पाच महिलांशीही चर्चा केली. तसंच पंतप्रधानांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात 5 हजार महिलांना संबोधित केलं. स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदींसोबत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, रॉजर बिन्नी यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित होते. याशिवाय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह उपस्थित होते.
खेळाडूंना फायदा होणार : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मी अशा दिवशी काशीत आलो आहे, जेव्हा भारत शिवशक्ती बिंदूवर पोहोचून एक महिना पूर्ण करत आहे. शिवशक्ती म्हणजे गेल्या महिन्याच्या २३ तारखेला आपले चांद्रयान जिथे उतरलं ते ठिकाण. शिवशक्तीचं एक स्थान चंद्रावर आहे, तर दुसरं स्थान माझ्या काशीत आहे. वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काशीमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारल्यास येथील खेळाडूंना फायदा होणार आहे.
खेळाडूना मदत : वाराणसीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. हे स्टेडियम केवळ वाराणसीसाठीच नाही, तर पूर्वांचलच्या तरुणांसाठीही वरदान ठरेल. जेव्हा हे स्टेडियम तयार होईल तेव्हा 30 हजारांपेक्षा जास्त लोक एकाच वेळी बसून सामना पाहू शकतील. भारताला क्रीडा क्षेत्रात जे यश मिळत आहे, ते खेळांबद्दलच्या दृष्टिकोनातील बदलाचा पुरावा आहे. सरकार खेळाडूंना सर्व स्तरावर मदत करत असल्याचं प्रतिपादन मोदींनी यावेळी बोलताना केलंय.
स्पोर्ट्स विद्यापीठ तयार होणार : जेव्हापासून स्टेडियमची रचना समोर आली आहे, तेव्हापासून प्रत्येक काशीवासीय आनंदी आहे. येथे एकापेक्षा जास्त सामने होतील. याचा फायदा माझ्या काशीला होईल. क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात आहे. नवीन देश क्रिकेट खेळत आहेत. आता आणखी नवीन क्रिकेट सामने होतील. बनारसचं स्टेडियम ही मागणी पूर्ण करेल. यूपीचे हे पहिले स्टेडियम पूर्वांचलचं स्टार असेल. बीसीसीआय सहकार्य करेल. मी बीसीसीआयचे आभार मानतो. स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीही बनारसला येणार आहे. इथं क्रीडाविषयक अभ्यास, अभ्यासक्रम सुरू होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
India Canada Relations : भारत-कॅनडा संघर्षाचा कृषी संसाधनांवर परिणाम? वाचा सविस्तर
Pm Narendra Modi : 'या' शहरात पंतप्रधान आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची करणार पायाभरणी