नवी दिल्ली - तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील तातडीच्या मदत कार्यांसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्यातील नुकसानीचे प्रमाण मोजण्यासाठी केंद्र सरकार राज्य दौरा करण्यासाठी एक पथक तैनात करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
किनारपट्टीसह सौराष्ट्राचेही मोठे नुकसान -
गुजरातच्या किनारपट्टीसह सौराष्ट्र भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्यात या वादळामुळे 13 जणांचा जीव गेला असून घरे, झाडे, वीजेचे खांब यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. सुमारे 96 तालुक्यांमध्ये चार इंचाहून अधिक पाऊस झाला. सहा तालुक्यांमध्ये आठ ते नऊ इंच पावसाची नोंद झाली. तर, दक्षिण गुजरातमध्ये तब्बल 14 इंच पावसाची नोंद करण्यात आली.
फक्त गुजरातच्या दौऱ्यावरून मोदींवर टीका -
चक्रीवादळाचा फटका गोवा, महाराष्ट्रासह गूजरातलाही बसला आहे. पंतप्रधानांचे गृहराज्य असल्याने ते गुजरातला जातीलही. कदाचित केंद्र सरकारला वाटत असेल की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संकटांचा सामना करण्यासाठी समर्थ आहेत. त्याचबरोबर सर्व संकटांशी सामना करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांची कदाचित पंतप्रधानांना खात्री पटली असेल. तसेच गुजरात मध्ये कमजोर सरकार असल्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे त्या भागाचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत ? नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? असा प्रश्न कॅाग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - 'बार्ज पी३०५' बचावकार्य LIVE Updates : आतापर्यंत १८५ जणांना वाचवण्यात यश; ३४ मृतदेह आढळले.