नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज (30 जानेवारी) पुण्यतिथी असून पंतप्रधान मोदींनी बापूंना आदरांजली वाहिली. महात्मा गांधींचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील. प्रत्येक भारतीयाच्या कल्याणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महिला आणि पुरुषांनी बलिदान दिले ते आमच्या कायमच आठवणीत राहतील, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली -
संपूर्ण देशवासियांच्या वतीने मी महात्मा गांधींना आदरांजली वाहतो. या दिवशी महात्मा गांधी हुतात्मा झाले. शांती, अहिंसा, साधेपणा, मानवता या गांधीजीच्या विचारांचे आपण अनुसरण केले पाहिजे. सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया, असे ट्विट राष्ट्रपतींनी केले आहे.
आज महात्मा गांधी यांची ७३ वी पुण्यतिथी आहे. या दिनी देशासह जगभरातून गांधीजींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी कट्टर हिंदुत्ववादी नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. महात्मा गांधींना सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणात आदरांजली वाहण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.