बंगळुरू - आयफोन तयार करणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीत मागील काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर पंतप्रधान मोदी चिंतित असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे. विस्ट्रॉन ही मूळची तैवानची कंपनी असून अॅपलसाठी आयफोन उत्पादनाचे काम करते. कर्नाटकातील बंगळुरूजवळील कोलार जिल्ह्यात कंपनीचा कारखाना आहे.
कंपनीत कामगारांकडून तोडफोड
अनेक कामगारांनी कंपनीत तोडफोड केली होती. तसेच कंपनीतील आयफोनही लुटण्यात आले होते. या प्रकरणी आता पोलीस तपास करत असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे. 'आम्ही या घटनेनंतर कारवाई केली आहे. विस्ट्रॉन ही आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी असून हिंसाचाराची घटना घडायला नको होती. पंतप्रधान मोदींनीही या घटनेनंतर चिता व्यक्त केली आहे. हिंसाचार करणाऱ्यांविरोधात आम्ही कठोर कारवाई करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एसएफआयच्या सदस्याला अटक
स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेच्या सदस्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कोणाला अटक केली यावर मी काहीही बोलणार नाही. मात्र, जे कोणी या घटनेस जबाबदार असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.