नवी दिल्ली - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. लस, ऑक्सिजन, औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या विदारक परिस्थितीवरून पंतप्रधान मोदींवर हल्ला केला आहे.
'देशात कोरोनाची लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत. उरलंय फक्त सेंट्रस व्हिस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे फक्त पंतप्रधानांचे फोटो', असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत.
सरकारची क्रूरता कधीपर्यंत -
बुधवारी सुद्धा राहुल गांधी यांनी टि्वट करून केंद्रावर निशाणा साधला होता. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संपत नसून दररोज दु:खद बातम्या समोर येत आहेत. पायाभूत समस्या सोडवण्यात आलेल्या नाहीत. या महामारीमध्ये मोदी सरकारची क्रूरता देशातील नागरिकांनी कधीपर्यंत सहन करायची? या महामारीत लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास जबाबदार असलेले लपून बसले आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले होते.
वाळूमध्ये डोकं टाकणे म्हणजे सकारात्मकता नाही -
सकारात्मक विचारसरणीचा खोटा आधार देणे म्हणजे आरोग्य कर्मचारी आणि करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबाची केलेती थट्टा आहे. वाळूमध्ये डोकं टाकणे म्हणजे सकारात्मकता नाही, ही देशवासीयांची फसवणूक आहे, असेही राहुल गांधी यांनी एका टि्वटमध्ये म्हटलं होते. तसेच त्यांनी यासंदर्भातील एक बातमी देखील शेअर केली होती.
हेही वाचा - ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावता कामा नये; गोवा सरकारला हायकोर्टाचे आदेश