नवी दिल्ली - देशातील विद्यापीठ शिखर संघटनेच्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. यावेळी मोदींनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर भाष्य केले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत देश प्रगती करत आहे, असे मोदी म्हणाले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जागतिक निकषांवर आधारित असून त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञांबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब पाहायला मिळते, असे मोदी म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षण संस्था या दोन्ही घटकांचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार कौशल्य विकासावर भर देत आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुशल युवा शक्तीची ऊर्जा महत्त्वपूर्ण आहे, असेही मोदी म्हणाले. भारतात लोकशाही ही सभ्यता आणि संस्कारांचा एक भाग आहे. स्वतंत्र्यानंतर भारताने लोकशाही आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून काम केले आहे. डॉ बाबासाहेब आबेंडकर यांनी देशाला मजबूत आधार दिला. बाबासाहेबांच्या पाऊलांवर पाऊल टाकत देश प्रगती करत आहे. गरीब, वंचित, शोषित आणि पीडितांच्या जीवनात अमुलाग्र बदल केला आहे, असे मोदी म्हणाले. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशनही मोदींच्या हस्ते करण्यात आले.
९५ वी बैठक -
गुजरातमधील अहमदाबाद मुक्त विद्यापीठातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. गुजरातचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत या दोन दिवसीय बैठकीत चर्चा होणार आहे. ही ९५ वी बैठक आहे. 1925 मध्ये या विद्यापीठांच्या शिखर संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
हेही वाचा - सीबीएससीची दहावीची परिक्षा रद्द; तर बारावीची परीक्षा लांबणीवर