शाहजहानपूर - एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच जणांनी हा सामूहिक बलात्कार केल्यानंतर त्या महिलेवर तेथील पोलीस निरीक्षकानेही पुन्हा बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ती महिला आधीच्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली असता, हा प्रकार घडला आहे.
घटनेतील ३५ वर्षीय पीडित महिला जलालबाद पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचाराची तक्रार दाखल कऱण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथील पोलीस निरीक्षकाने तिला शेजारच्या खोलीत नेऊन तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार केले आहेत. अत्याचाराची ही घटना ३० नोव्हेबरला घडली आहे.
कारमधून अपहरण आणि निर्जन स्थळी अत्याचार-
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ३० नोव्हेबरला रस्त्याने जात असताना एका कारमधून आलेल्या पाच जणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर पाचही जणांनी अत्याचार केला. त्यानंतर तिने या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी जलालाबाद पोलीस स्टेशन गाठले असता, त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला, त्यामुळे तिने थेट बरेलीचे सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची बुधवारी भेट घेतली. त्यानंतर एडीजी चंद्रा यांनी महिलेच्या तक्रारीची चौकशीचे आदेश दिले.
यापूर्वीही महिलेकडून तक्रारी-
या प्रकरणात त्या महिलेने यापूर्वीही तिने शाहजहानपूरमध्ये् ४ तक्रारी दाखल केल्या आहेत. तिच्या या तक्रारीवर यापूर्वीच तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच त्या पोलीस उपनिरीक्षका विरोधात तक्रार करण्यासंदर्भात त्या पीडित महिलेने आमच्याशी संपर्कच साधला नसल्याची माहिती वरीष्ठ पोलीस अधीक्षक एस आनंद यांनी दिली. तिने थेट महासंचालकांकडे तक्रार केली आहे. तसेच तिने याआधीच लैंगिक अत्याचाराच्या काही तक्रारी दाखल केल्या असून त्या तक्रारी तपासाधीन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.