अमरावती : आंध्र प्रदेशच्या एलुरु गावामधील ३००हून अधिक लोकांना एका अज्ञात आजारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील या गावामध्ये असणारे लोक गेल्या दोन दिवसांपासून अचानक बेशुद्ध पडत आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यांपैकी ४६ लोकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी १००हून अधिक रुग्णांची नोंद..
शनिवारी अचानक सुमारे १०० लोकांना या अज्ञात आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारीही या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. एकूण रुग्णांपैकी २२७ रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुमारे ७० रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, अतिगंभीर अशा पाच रुग्णांवर विजवाडाच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारांनंतर सुधारणा..
एलुरु वेस्ट स्ट्रीट, एलुरु साऊथ स्ट्रीट, कोट्टापेटा, शनिवारपुपेटा आणि आदिवारपुपेटा या भागांमधील लोकांना ही बाधा झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना चक्कर येण्यासोबतच, डोकेदुखी आणि उलटी येणे अशी लक्षणं दिसून येत आहेत. उपचारांनंतर या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून येत असल्याचे सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.
चौकशी सुरू..
आरोग्यमंत्री अल्ला नानी हे एलुरुमधील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ज्या ठिकाणी असे रुग्ण आढळून येत आहेत त्या ठिकाणी वैद्यकीय कॅम्प उभारण्यात येत आहेत. तसेच, गावातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.