नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर आहे. एकीकडे संसर्गाची भीती कायम आहे. मात्र, संचारबंदीमुळे एक चांगली गोष्टही पाहायला मिळत आहे. वातावरण स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम झाला असून प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात खाली घसरली आहे.

सहारनपूरमधून हिमालयाचे टोक स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. पावसानंतर आकाश एकदम मोकळे झाले आहे. आयएफएस रमेश पांडे यांनी टि्वट करत हिमालय दिसत असल्याचे एक सुंदर असे छायाचित्र शेअर केले आहे. हे छायाचित्र डॉक्टर विवेक बॅनर्जी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सहारनपूरसह पंजाबच्या जालंधरमधून सुद्धा हिमालयाची रेंज पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे नागरिक घरांमध्ये बसून आहेत. उद्योगधंदे आणि सार्वजनिक वाहतूकही थोड्याप्रमाणात चालू आहे. त्यामुळे दररोज होणारे प्रदूषण थांबले असून पर्यावरणावर याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. तर हवा शुद्ध झाली आहे.

