नवी दिल्ली Parliament Security Breach : नुकत्याच झालेल्या संसदेतील त्या घटनेवर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज लोकसभा आणि राज्यसभेत नोटीस दिलीय. प्रेक्षक गॅलरीतून स्मोक गॅस असलेल्या दोन व्यक्तींनी लोकसभेत उडी मारल्यानं सभागृहात गोंधळ उडाला होता. विरोधी खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या विषयावर निवेदनाची मागणी केलीय.
चर्चा करण्यासाठी स्थगन नोटीस : संसदेत गोंधळ घातल्यानं विरोधी पक्षांचे 14 खासदार निलंबित झाले आहेत. यात 13 लोकसभेतील आणि 1 राज्यसभेतील खासदाराचा समावेश आहे. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या 13 खासदारांपैकी नऊ काँग्रेसचे, दोन सीपीएम, एक सीपीआय आणि एक द्रमुकचा आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे लोकसभा खासदार मनीष तिवारी यांनी संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलीय. तर डीएमके खासदार टी शिवा यांनी 13 डिसेंबरच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची सूचना मांडलीय.
त्यादिवशी काय घडलं : 2001 च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनीच संसदेचा सुरक्षा भंग झाला. सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोघांनी 'झिरो आवर' मध्ये प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली. आरोपींनी डब्यातून पिवळा वायू सोडला. तसंच यांनी खासदारांनी रोखण्यापूर्वी सरकारविरोधी घोषणा दिल्या. तर संसदेबाहेरील दुसर्या घटनेत, नीलम (42) आणि अमोल (25) या दोन आंदोलकांनी संसदेबाहेर अशाच प्रकारचे गॅसचे डबे घेऊन निदर्शने केली. चौघांनाही 14 डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षानं सात दिवसांच्या कोठडीत पाठवलं होतं.
गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन बोलावं : तत्पूर्वी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून सभागृहात निवेदन करण्याची पुन्हा मागणी केलीय. मोठ्या प्रमाणात सुरक्षेचं उल्लंघन झाल्यानं काँग्रेसच्या अध्यक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधतला. काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की भाजपा नेते सभागृहाचे कामकाज चालू देण्यास तयार नाहीत. तसंच ही गंभीर समस्या असून सरकारनं याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावं, असं आपण संसदेत वारंवार सांगत आहोत. पण त्यांना संसदेत यायचे नाही. लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट नाही. पण जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही, असं खर्गे यांनी म्हटलंय.
हेही वाचा :