नवी दिल्ली : अदानी वादावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने लोकसभेचे कामकाज शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तसेच राज्यसभेचे कामकाजही दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. काल अदानी समूहावरील फसवणुकीच्या आरोपांवरून दोन्ही सभागृहात दिवसभर प्रचंड गदारोळ झाला होता. शुक्रवारी सकाळी विरोधी पक्षांनी संसदेत अदानी विरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक घेतली.
मल्लिकार्जून खरगे म्हणाले : लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सरकार दबावाखाली अशा कंपन्यांना कर्ज का देत आहे, हे आम्हाला सांगायचे आहे. ते म्हणाले की, लोकांचे हित आणि एलआयसी, एसबीआयच्या गुंतवणुकीचा विचार करून आम्ही चर्चेची मागणी करत आहोत. जेपीसी स्थापन करून किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. ते म्हणाले, तपासानंतर अहवाल जनतेसमोर ठेवला पाहिजे जेणेकरून पारदर्शकता येईल आणि लोकांना विश्वास वाटेल की त्यांचे पैसे वाचले आहेत.
जयराम रमेश यांचे ट्विट : काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी ट्विट केले की, पंतप्रधान एलआयसी, एसबीआय आणि इतर संस्थांना अदानी समूहात गुंतवणूक करण्यास भाग पाडत आहेत. केवळ स्वतंत्र तपासच त्यांना हे करण्यापासून रोखू शकतो. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत चीनसोबतच्या सीमा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आहे. त्याचवेळी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनीही अदानी एंटरप्रायझेसच्या विरोधात हिंडेनबर्ग अहवालावर चर्चेसाठी स्थगिती प्रस्तावाची सूचना दिली आहे.
अर्थमंत्र्यांनी घेतला भाजप खासदारांचा क्लास : संसदेच्या सत्रा आधी अर्थसंकल्पा संदर्भात संसद भवनात भाजप खासदारांची बैठक घेण्यात आली. आपल्या सर्व खासदारांना अर्थसंकल्पाची आणि खासदारांनी कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जावे, याची माहिती देण्यासाठी पक्षाने ही बैठक बोलावली होती. भाजपचे खासदार सभागृहात आणि सभागृहाबाहेर या मुद्यांवर विरोधी पक्षांना उत्तर देतील. भाजप खासदारांच्या या अर्थसंकल्पीय कार्यशाळेत पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा सदस्य उपस्थित होते. सरकारच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना आणि समाजातील विविध घटकांना फायदा व्हावा यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.