नवी दिल्ली - आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेच्या कामाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ केला. यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
तर राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यामुळे सुरुवातीला 12 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. मात्र, पुन्हा दुपारी एक वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाम स्थगित करण्यात आले आहे. इस्रायली स्पाइवेयर पेगाससच्या माध्यमातून राजकारणी, मंत्री, पत्रकार आणि काही प्रमुख लोकांवर पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते आनंद शर्मा यावेळी म्हणाले की, हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर तत्काळ चर्चा व्हायला हवी.
हेही वाचा - अदानी समुहाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यालय गुजरातमध्ये हलविले
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांना काही मुद्दे मांडायचे होते. यावर लोकसभा अध्यक्ष ओमबिर्ला यांनी त्यांना सांगितले की, जर तुम्हाला काहीही सांगायचे असेल, तर त्याआधी तुम्हाला नोटीस द्यावी लागेल.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातला.
पेगासस प्रकरणावर अमित शाह म्हणाले, क्रोनोलॉजी समजून घ्या...
द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून पेगासस स्पायवेअर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जागतिकस्तरावर भारताला अपमानित करण्याचा काही वर्गांकडून प्रोत्साह दिले जात आहे. त्याबाबत आम्ही सायंकाळी रिपोर्ट पाहिला आहे. विध्वंस करणाऱ्या कटाच्या माध्यमातून भारताचा विकास हा रुळावरून घसरणार नाही. पावसाळी अधिवेशन विकासाचा नवा मापदंड करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
काय आहे पेगासस सॉफ्टवेअर -
पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. ज्याद्वारे आयफोन आणि अँड्रॉइड डिव्हाइस हॅक केले जाऊ शकतात. यासह, मालवेअर पाठविणारे त्या फोनचे संदेश, फोटो आणि अगदी ई-मेल पाहू शकतात.