चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी मंगळवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी मोहालीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकाशसिंग बादल हे तब्बल 5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सर्वात तरुण सरपंच ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
छातीत दुखल्याने केले होते रुग्णालयात दाखल : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिह बादल यांना छातीत दुखत असल्याचा त्रास होत होता. त्यामुळेच छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना जून २०२२ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकाश सिंह बादल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी मंगळवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.
घोड्यावरुन जात होते शाळेत : माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील अबुल खुराना या गावात झाला आहे. त्यांच्या आईचे नाव सुंदरी कौर आणि वडिलांचे नाव रघुराज सिंह होते. प्रकाश सिंह बादल यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत घेतले. मात्र पुढील शिक्षणासाठी त्यांना लांबी येथील शाळेत जावे लागले. लांबी हे गाव लांब असल्याने प्रकाश सिंह बादल त्यांच्या गावातून घोड्यावरून शाळेत जात असत. त्यानंतर उच्च माध्यमीक शिक्षणासाठी ते फिरोजपूर येथील मनोहर लाल मेमोरियल हायस्कूलमध्ये दाखल झाले होते.
व्हायचे होते अधिकारी, झाले राजकारणी : प्रकाश सिंह बादल यांना पीसीएस अधिकारी व्हायची इच्छा होती. त्यासाठी ते मेहनतही करत होते. त्यामुळेच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी लाहोरच्या शिख महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र देशाची फाळणी झाल्याने स्थलांतर झाले. त्यामुळे त्यांनी फोरमॅन ख्रिश्चन महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पीसीएस अधिकारी पदासाठी तयारी सुरू केली. मात्र अकाली नेते ग्यानी करतार सिंग यांच्या प्रभावामुळे ते राजकारणात आले.
विधानसभा निवडणुकांपासून निष्क्रिय : प्रकाश सिंह बादल यांनी 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच प्रकाश सिंह बादल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. म्हातारपणामुळे त्यांना ही निवडणूक लढवायची नव्हती, पण सुखबीर बादल यांच्या विनंतीनंतर आणि पंजाबमधील अकाली दलाची दयनीय स्थिती पाहून प्रकाशसिंग बादल निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
सर्वात तरुण सरपंच आणि सर्वात वयस्कर उमेदवार : प्रकाश सिंह बादल यांनी 1947 मध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी सरपंचाची निवडणूक लढवली आणि जिंकले. त्यानंतर ते सर्वात तरुण सरपंच झाले. 1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 1969 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. 1969-70 पर्यंत ते पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आदी विभागाचे मंत्री होते. यासोबतच ते 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवून सर्वात वयस्कर उमेदवार बनले आहेत.
हेही वाचा - Prakash Singh Badal : प्रकाश सिंग बादल यांचे निधन, केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर