श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराने आज (रविवार) काश्मिरातील पुंछ जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मोर्टार आणि शेल तोफांद्वारे पाकिस्तानने गोळीबार केल्याच्या वृत्ताला लष्कराच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशीही पाकिस्तानने गोळीबार करून काश्मिरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता.
मेंढर सेक्टरमध्ये गोळीबार -
सायंकाळी सव्वाचारच्या दरम्यान मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी गोळीबार आणि तोफांचा मारा केला. त्यास भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नसल्याचे लष्कराने म्हटले आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोळीबार -
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून काश्मिरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता. मोर्टार शेल आणि तोफांनी पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला होता. सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या या आगळीकीला तत्परतेने आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. शुक्रवारी सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. त्यामुळे सीमेवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यासोबतच काश्मिरातील नौशेरा सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला होता.