श्रीनगर - पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्मिरच्या कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर (International Border) पाकिस्तानकडून बेछुट गोळीबार झाला आहे. हिरानगर परिसरातील कारोल क्रिष्णा, मन्यारी आणि सतपाल भागात बेछूट गोळीबार करण्यात आला. शनिवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी सुरू झालेली फायरिंग पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होती, अशी माहिती आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
दरम्यान, भारताच्या बाजूने कुठल्याही नुकसानाची किंवा मृत्यूची बातमी नाही. रात्रीच्या वेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी स्थानिकांना लक्ष्य केले होते, अशीही माहिती आहे. आम्ही नेहमी भीतीत जगतो. आम्हाला बऱ्याचदा बंकरमध्ये पूर्ण रात्र घालवावी लागते, असे स्थानिक रहिवासी शामलाल यांनी सांगितले.