विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) - महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन 'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. अशी माहिती स्वत: रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. जवळपास 100 टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस आज रात्रीपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस वायझॅकवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. रेल्वेने देशातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणं आणि नावीन्यपूर्ण कामे करुन कठीण काळात देशाची सेवा केली आहे’, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल ट्वीट करुन दिली आहे.
गुरुवारी सकाळी ७ टँकरना घेऊन जाणारी ऑक्सिजन ट्रेन महाराष्ट्रातून विशाखापट्टणम स्टील प्लांट येथे दाखल झाली होती. रेल्वे प्रशासनाने मेडिकल लिक्विड ऑक्सिजनचे ७ टँकर पुरवण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था केली होती. यामुळे राज्याला १०० मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. एकूण 7 टँकरमध्ये शंभर टन लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन पाठवण्यात आला आहे. यासाठी विशाखापट्टणम स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांनी रोलिंग मिल्स परिसरात विशेष रेल्वे ट्रॅक बांधला होता.
वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लिक्विड ऑक्सिजन तयार केले आहे. ते सात टँकरमध्ये शंभर टन लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन साठवण्याची क्षमता आहे. हे ऑक्सिजन - १८२ अंश तापमानावर ठेवावे लागणार आहे. वाहतुकीदरम्यानही समान तापमान राखले जाणार आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राला दिवसाला २६ नव्हे, तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन द्या - नवाब मलिक
हेही वाचा - लोकल, मेट्रो आणि मोनोची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद!