अंबाला (हरयाणा) - देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना ऑक्सिजनचं महत्व कळालं. अशातच अंबालामध्ये एका व्यक्तिनं स्वतःच्या घरीच ऑक्सिजन प्लांट लावला आहे. 78 वर्षीय प्राध्यापक वेद प्रकाश विज यांनी घरी अनेक झाडे आणि रोप लावले आहेत. त्यांच्या घरी एक हजार पेक्षा जास्त कुंड्यांमध्ये विविध प्रकारची रोपं लावली आहेत.
प्राध्यापक वेद प्रकाश सांगतात, की त्यांच्या गुरूंनी त्यांना 1982 साली फुलाचं एक रोप दिलं होतं. तेव्हापासून त्यांना झाडं लावायला आवडायला लागलं आणि त्यांनी अनेक झाडे लावली. ४० वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर २००४मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर ते घरी राहून झाडांची काळजी घेतात आणि नेहमी नवनवी झाडं घरी लावतात आणि त्यांना पाणी टाकून मोठी करतात.
प्राध्यापक विज यांनी सांगितलं, की त्यांच्याजवळ 80 प्रकारचे प्लांट आहे. त्यांना प्रत्येक ऋतूत फुलं येतात. त्यांनी इंग्लंडच्या लिफ्टन नर्सरीतून फ्रीजिया प्रजातीचं रोपटं आणून घरी कुंडीत लावलंय. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून ते रोपटं छान वाढत आहे. प्राध्यापक विज सांगतात, की मी वेगवेगळ्या प्रकारची फुलांची रोपं घरी लावली आहेत. मात्र, मला भारतीय फूल जास्त आवडतात.
प्राध्यापक विज यांनी त्यांच्या छोट्याशा नर्सरीत 10 पेक्षा जास्त ऑक्सिजन देणारे रोप लावले आहेत. त्यामध्ये पिंपळ, एरिका, पाम, फर्न्स आणि इतर काही आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून निसर्ग जपण्यासाठी शक्य होईल, तेवढी जास्त झाडे लावली पाहिजे.