नवी दिल्ली : दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली होती. ही दुर्घटना कशी झाली, आणि ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत रुग्णालयाने आधी का नाही सांगितले, असे प्रश्न आता मृतांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.
हरी सिंग तोमर सांगतात, की "माझी बहीण उपचारांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होती. काही दिवसांमध्येच तिला डिस्चार्जही मिळाला असता. रुग्णालय प्रशासनाने आम्हाला ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत आधीच सांगितले असते, तर आम्ही प्लाझ्मा आणि इतर गोष्टींप्रमाणे तोदेखील बाहेरुन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयांना केवळ त्यांच्या बिलाचं पडलं आहे. माझ्या बहिणीच्या उपचारासाठी आम्ही घरही गहाण ठेवलं होतं", असं हरी म्हणाले.
दुसऱ्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले, की आपण आपल्या लहान भावासोबत शुक्रवारीच फोनवर चर्चा केली. त्याची तब्येत तेव्हा अगदी ठीक होती. त्याची ऑक्सिजन लेव्हल तेव्हा ९२ होती. त्यानंतर पुढे काय झाले ते मला माहिती नाही. थेट तो गेल्याचीच बातमी रुग्णालयाने आम्हाला दिली.
कमाल खेरा यांनी या अपघातात आपला भाऊ आणि वहिनी दोघांना गमावले. रुग्णालयाने ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत आपल्याला काहीच माहिती दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी थेट मला हे दोघे गेले असल्याची माहिती दिली, आणि फॉर्म भरुन बिल भरण्यास सांगितले.
रुग्णालयाचे एमडी डी. के. बालुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ अतिगंभीर रुग्णांचाच या दुर्घटनेत मृत्यू झाला. ऑक्सिजन प्रेशरमध्ये अचानक घसरण झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. शुक्रवारी सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २५ रुग्ण दगावल्याची घटना ताजी असतानाच, शनिवारी हा प्रकार समोर आला.
हेही वाचा : उत्तराखंडमधील नर्सिंग कॉलेजचे ९३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!