कोलकाता - येत्या काही महिन्यांत बंगाल विधानसभा निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी नुकताच बंगाल दौरा करत मुस्लीम मते मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे तृणमूल सरकारला खाली खेचण्यासाठी भाजपही आक्रमक झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल इमाम असोशिएशनने ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. ओवैसी हे कोणी गॉडफादर नसून नागरिकांनी धर्माच्या आधारावर मतदान करून नये, असे आवाहन असोशिएशनचे नेते मोहम्मद याहया यांनी केले आहे.
बंगालच्या जनतेचा विकासावर विश्वास -
बंगालमध्ये निवडणुका धर्माच्या आधारावर लढल्या जात नाही. बंगालमधील नागरिक विकासावर विश्वास ठेवत असल्याने ओवैसी यांच्या प्रभावाचा काहीही फरक पडणार नाही. ओवैसी हे कोणी गॉडफादर नाहीत, की जनता त्यांचे सर्व काही ऐकेल, असे मोहम्मद याहया म्हणाले.
भाजप, एमआयएमकडून मतांचे राजकारण -
बंगाल निवडणुकीत धर्माचे राजकारण करत असल्याचे म्हणत याहया यांनी ओवैसींवर टीका केली. भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. " भाजपा एमआयएमप्रमाणे बंगालच्या जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुका फक्त हिंदू आणि मुस्लीम बहुल भागांसाठीच नाहीत तर सर्वांसाठी आहेत. अल्पसंख्य समाजाचा प्रभाव असलेल्या भागातच एमआयएम निवडणुका का लढत आहे? धर्माच्या नावावर मते मागू नका, असे आवाहन याहया यांनी नागरिकांना केले.
एमआयएमची विविध राज्यात एंन्ट्री -
एमआयएम पक्षाने बिहार निवडणुकीत चांगली कामगिरी करत ५ जागा जिंकल्या. त्यानंतर बंगाल विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय ओवैसींनी घेला. सोबतच गुजरातमधील स्थानिक संस्थाच्या निवडणुकीतही एमआयएम उतरली होती. मुस्लीम मते मिळवण्यात एमआयएम पक्षाला यश येत असल्याचे मागील काही दिवसांत झालेल्या निवडणुकांतून दिसून येत आहे. बिहार निवडणुकीत यश मिळाल्याने ओवैसी यांच्या पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे.