नवी दिल्ली - कोरोना संकट काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत योजना' सुरू केली होती. या योजने अंतर्गत आतापर्यंत 90 लाख भारतीयांना विमानाद्वारे जगातल्या विविध देशातून भारतात परत आणण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय नगरी उड्डाण वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. मे 2020 पासून ही मोहीम चालू आहे.
वंदे भारत ही जगातील सर्वात मोठी आणि विविध अनुभव शिकवणारी महत्वपूर्ण अशी मोहीम होती. भविष्यात या विशालतेचे मिशन राबवायचे असल्यास हा अनुभव उपयोगी पडेल, असे टि्वट पुरी यांनी केले. तसेच 6 जूनला वंदे भारत योजनेअंर्गत 3 हजार 479 भारतीयांना स्वदेशी आणण्यात आले आहे. यूएई, सौदी अरेबिया, मलेशिया, कतार, लंडन, काबुल, मस्कट, कुवैत, शारजाह, दोहा, रियाद येथून भारतीयांना परत आणण्यात आले.
7 मे 2020 ला सुरू केले होते 'वंदे भारत मिशन'
परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने 7 मे 2020 ला जगातील सर्वात मोठी मोहीम सुरू केली होती. 'वंदे भारत मिशन' अभियानामध्ये प्रथम एअर इंडिया आणि त्याच्या सहायक एअर इंडिया एक्सप्रेसने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर इतर विमान कंपन्याही यात सहभागी झाल्या. भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी हवाई मार्गाबरोबरच जलमार्गाचाही वापर करण्यात आला, जहाजांद्वारेही लोकांना मायदेशी आणण्याचे कार्य करण्यात आले. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, केनिया, श्रीलंका, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, बांगलादेश, थायलंड, दक्षिण अफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यामनार, जपान, युक्रेन, व्हिएतनाम आदी देशातून भारतीयांना मायदेशी आणण्यात आले.