उस्मानाबाद - कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे गर्भलिंग तपासणी व निदान करणाऱ्या रॅकेटचा उस्मानाबाद आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे.
कर्नाटक राज्यात जाऊन आरोग्य विभागाने ही धाडसी कारवाई केली आहे. ( Gender Diagnosis Racket In Karnataka) आरोग्यमंत्र्यांनी गर्भलिंग तपासणी मुद्दा हाती घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाच्या वतीने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. गुलबर्गा येथील डॉ. गुरुराज कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर डॉ. कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे.
डॉ. कुलकर्णी हा घरातच सोनोग्राफी करून गर्भलिंग तपासणी व निदान करीत होता. आरोग्य विभागाला ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करुन पर्दाफाश केला. यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. विक्रम आळंगीकर, विधी सल्लागार ॲड. रेणुका शेटे, या दोघांनी गुलबर्गा येथे जाऊन ही मोहीम यशस्वी केली. तर, या पथकात परिसेविकास सुनंदा गोस्वामी, तंत्रज्ञ पद्माकर घोगे, स्टाफ नर्स गोकर्णा पांचाळ, व शिदोरे यांनी या पथकात सहभाग घेतला होता.
डॉ. कुलकर्णी गर्भलिंग तपासणी व निदान करण्यासाठी प्रति रुग्णाकडून पंधरा हजार रुपये घेत असल्याची माहिती समोर येत आहे. तर, एजंटला प्रति रुग्ण दोन हजार रुपये कमिशन देण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, विधी सल्लागार ॲड. रेणुका शेटे, उमरगा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम आळंगीकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, नोडल ऑफिसर डॉ. दत्तात्रय खुणे, यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.