चंदीगढ : हरियाणामधील पाच रहिवासी इंग्लंडहून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर या व्यक्तींचे स्वॅब नमुने पुन्हा चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, की ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूची लागण झाली आहे हे तपासण्याचे काम आता सुरू आहे.
यामधील यमुनानगरमध्ये आढळलेल्या व्यक्तीला ईएसआय रुग्णालयाच्या आंतरराष्ट्रीय वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासोबतच, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचेही स्वॅब सॅम्पल गोळा करण्यात आले आहेत. या व्यक्तीचे सॅम्पल दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा देखरेख अधिकारी डॉ. व्हगिश गुटैन यांनी दिली.
ब्रिटनहून हरियाणामध्ये आतापर्यंत १,७४० नागरिक परतले आहेत. त्यांच्यापैकी आतापर्यंत ८०० ते ९०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोरा यांनी याबाबत माहिती दिली. यांपैकी पाच व्यक्ती आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवा कोरोना स्ट्रेन..
कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यश आले असतानाच ब्रिटन आणि युकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. या नव्या विषाणूमुळे ब्रिटन युकेमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लंडन, युके येथून येणारी विमाने २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आली होती.
'भारतात बनवलेली कोरोनावरील लस नव्या विषाणूवरही प्रभावी'
भारतात तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस नव्या विषाणूवरही प्रभावी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (न्यू स्ट्रेन) आढळला असून जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही या नव्या विषाणूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या घोषणेनंतर सर्वांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.
हेही वाचा : चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले