भुवनेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात नागरिक रस्त्यावर येणार नसल्यामुळे भटक्या जनावरांना कोणीही खाद्य पुरवू शकणार नाही. याचा विचार करुन ओडिशा सरकारने या जनावरांसाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी रविवारी याबाबत घोषणा केली.
हे पैसे मुख्यमंत्री निधीतून वापरले जाणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. पाच महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि ६१ एनएसींना ही रक्कम वाटून देण्यात येणार आहे. या प्रशासनांंनी स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने भटक्या जनावरांना खाद्य पुरवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
जाजपूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या एका अहवालानुसार, स्थानिक प्रशासनाने रविवारी महाविनायक मंदिर आणि चंदीखोले परिसरातील भटकी वानरे, भटके कुत्रे आणि गायींना खाद्यवाटप केले. जिल्हा प्रशासनाने स्थनिक नागरिकांनादेखील भटक्या जनावरांना खाद्य देण्याचे आवाहन केले आहे.
पटनाईक यांनी यापूर्वीदेखील लॉकडाऊनमध्ये भटक्या जनावरांना खाद्य पुरवण्यासाठी निर्णय घेतला होता. यासाठी त्यांना प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था 'पेटा'कडून पुरस्कारही देण्यात आला आहे.
हेही वाचा : कोरोना रुग्ण दगावल्यानंतर लावला ऑक्सिजन; बिहारमधील विदारक प्रकार