भुवनेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही कोरोनाची लस टोचवून घेतली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी जरूर घ्यावी", असं आवाहन पटनायक यांनी केले.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-१९' लसीकरण आज(सोमवार) पासून सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच, वयाची 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही राबविण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांपैकी ज्या रुग्णालयांमध्ये 'जन आरोग्य योजना' व केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबविण्यात येत आहेत, अशा खासगी रुग्णालयांना या लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 15 हजार 510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 106 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 11 हजार 288 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 96 हजार 731 आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 7 लाख 86 हजार 457 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 1 लाख 57 हजार 157 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 68 हजार 627 आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 1 हजार 266 जणांना लस टोचवण्यात आली आहे.