कर्नाल - कर्नालमधील शेतकऱ्यांवर झालेल्या 'लाठीचार्ज'ची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने शुक्रवारी जिल्हा उपायुक्त निशांत कुमार यादव यांना नोटीस बजावली. यादव यांना नोटीसला उत्तर देण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रभारी विवेक बंसल, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख कुमारी सेल्जा, आमदार किरण चौधरी, खासदार दीपेंद्र हुड्डा आणि कॅप्टन अजय यादव यांच्यासह हरियाणा काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी एनएचआरसीशी संपर्क साधून घटनेसंदर्भात निवेदन दिले होते. त्यांनी कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा यांच्या निलंबनाची मागणी केली होती.
कर्नालमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात 28 ऑगस्ट रोजी तीन शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन केले. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले होते. तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर यातच कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते पोलिसांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे डोके तोडण्यास सांगत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा सरकावर जोरदार टीका झाली. यानंतर आयुष सिन्हा यांना हरियाणा सरकार, नागरिक संसाधन माहिती विभाग (सीआरआयडी) चे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
हेही वाचा - हरयाणात पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चकमक; 50 पोलीस जखमी