नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. नवीन जबाबदारी पार पडताना पंतप्रधानांच्या व्हिजनप्रमाणे काम करणार असल्याचे काही मंत्र्यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ४३ मंत्र्यांमध्ये ३६ नवीन चेहरे आहेत. आज मनसुख मांडवीय, ज्योतिरादित्य सिंधिया, कौशल किशोर यांनी नवीन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
मनसुख मांडवीय - रसायन आणि खते विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून मनसुख मांडवीय यांनी आज पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मिर्भर भारताच्या दिशेने काम करणार असून देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. मनसुख मांडवीय यांना केंद्रीय आरोग्य मंत्रिपद, रसायन आणि खते विभाग सोपवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा पदभार त्यांनी गुरुवारी घेतला आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माजी नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी उपस्थित होते. यापूर्वी हरदीप सिंग पुरी यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालय होते. मात्र, मंत्रीमंडळाच्या विस्तारात हे मंत्रालय सिंधिया यांना सोपवण्यात आले आहे. तर हरदीप सिंग पुरी यांना गृहनिर्माण आणि शहर विकास या मंत्रालयासह पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.
कौशल किशोर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राज्यमंत्री कौशल किशोर यांना गृहनिर्माण आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे. आज त्यांनी गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.