नवी दिल्ली - डॉक्टरांचे महत्त्व हे वेगळे सांगण्याची गोष्ट नाही. कारण, आज कोरोनाच्या संकटात सर्वांनाच त्यांचे महत्त्व कळाले आहे. देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कोरोनाच्या संकटात डॉक्टर अहोरात्र करत आहेत. न थकता, न थांबता, प्राण धोक्यात घालून सर्व डॉक्टर्स रुग्णांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने अनेकांनी डॉक्टरांप्रती आभार व्यक्त केले आहेत.
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मानार्थ 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
केंद्र सरकारने 1991 ला डॉक्टर दिनाची घोषणा केली. भारतात 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन असतो. तर, अमेरिकेत 30 मार्च, क्युबामध्ये 3 डिसेंबर आणि इराणमध्ये 23 ऑगस्ट हा डॉक्टर दिन असतो.
कोण आहेत डॉ. बिधान चंद्र रॉय?
राष्ट्रीय डॉक्टर दिन सर्वप्रथम 1991 साली बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या मानवतेच्या सेवेतील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून साजरा करण्यात आला. डॉ रॉय हे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देणारे एक महान डॉक्टर होते. डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 ला बिहारमध्ये झाला होता. डॉक्टर होण्याचा त्यांचा ध्यास हा अचंबित करणारा होता. इंग्लंडच्या सेंट. बार्थोलोम्यूस रुग्णालयात दाखल होण्यासाठीचा त्यांचा अर्ज 30 वेळा फेटाळण्यात आला होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली वैद्यकीय पदवी कलकत्त्याहून घेतली, तर एमआरसीपी आणि एफआरसीएस पदव्या या इंग्लंडहून मिळवल्या होत्या. 1911 मध्ये त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर त्यांनी कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयात काम करणे सुरू केले. त्यानंतर कॅम्पबेल वैद्यकीय महाविद्यालय आणि कार्मिशेल वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांनी काम केले.
ते प्रसिद्ध डॉक्टर आणि स्वातंत्र्यसेनानीही होते. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी महात्मा गांधींना पाठिंबा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेस नेते, आणि कालांतराने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीही झाले. एक जुलै 1962 ला त्यांचा मृत्यू झाला. भारतीय वैद्यकीय परिषदेने त्यांच्या स्मरणार्थ डॉ. बी. सी. रॉय नॅशनल अवॉर्ड फंडची स्थापना केली. तर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणारा डॉ. बी. सी. रॉय नॅशनल अवॉर्ड 1976 पासून सुरू झाला. 4 फेब्रुवारी 1961 ला त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, म्हणजेच 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला.
कोरोनामुळे देशभरातील 594 खासगी डॉक्टरांचा मृत्यू-
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता देशभरातील खासगी डॉक्टरही रुग्णसेवा देत आहेत. या दरम्यान मोठ्या संख्येने खासगी डॉक्टर कोरोना बाधित होत असून त्यात मोठ्या संख्येने डॉक्टर मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र पहिल्या लाटेत पाहायला मिळाले. तर दुसऱ्या लाटेतही मोठ्या संख्येने खासगी डॉक्टर कोरोनाचे बळी ठरले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने नुकतीच यासंबधीची राज्यनिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारी नुसार देशभरातील 594 डॉक्टरांचा बळी दुसऱ्या लाटेत गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यात महाराष्ट्रातील 17 डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनामुळे दगावलेल्या डॉक्टरांपैकी सर्वाधिक डॉक्टर हे दिल्लीतील आहेत. दिल्लीतील 107 खाजगी डॉक्टर कोरोनाचे शिकार ठरले आहेत.
हेही वाचा - जागतिक फॅमिली डॉक्टर दिन २०२१