नवी दिल्ली Narendra Modi : हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली. "भारतानं इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे", असं ते म्हणाले. "हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात नागरिकांच्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही संवाद, मुत्सद्देगिरी आणि संयम राखण्यावर भर दिला आहे", असं त्यांनी नमूद केलं.
'ग्लोबल साऊथ' देशांना एकत्र येण्याची वेळ आली : "पश्चिम आशियातील घडामोडींमुळे नवीन आव्हानं उभी राहिली आहेत. आता 'ग्लोबल साऊथ' देशांना एकत्र येण्याची वेळ आलीये. संपूर्ण जगाचे हित साधण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे", असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतानं आयोजित केलेल्या दुसऱ्या 'व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट'ला आभासी पद्धतीनं संबोधित करत होते. 'ग्लोबल साउथ' असं प्रामुख्याने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील विकसनशील, कमी विकसित किंवा अविकसित देशांना म्हटलं जातं. विशेष म्हणजे, भारतानं जानेवारीमध्ये 'व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट'च्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन केलं होतं.
'व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ' सर्वोत्तम व्यासपीठ : २१ व्या शतकातील बदलत्या जगाला प्रतिबिंबित करण्यासाठी 'व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ' हे सर्वोत्तम व्यासपीठ असल्याचं मोदी म्हणाले. "आम्ही १०० हून अधिक देश आहोत, मात्र आमचे प्राधान्यक्रम समान आहेत", असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेत सल्लामसलत, संवाद, सहकार्य, सर्जनशीलता आणि क्षमता निर्माण या पाच 'सी' च्या चौकटीत राहून सहकार्याचं आवाहन केले.
जी २० मध्ये आफ्रिकन युनियन : यावेळी बोलताना पंतप्रधानांनी जी २० मध्ये आफ्रिकन युनियनच्या सहभागाचाही उल्लेख केला. "भारताच्या प्रयत्नांमुळे आफ्रिकन युनियनचा जी २० मध्ये स्थायी सदस्य म्हणून समावेश झाला. तो ऐतिहासिक क्षण मी विसरू शकत नाही", असं ते म्हणाले. जी २० मध्ये 'ग्लोबल साऊथ'च्या देशांना अर्थ आणि वित्तपुरवठा करण्यात आला आहे.
हेही वाचा :