डेहराडून (उत्तराखंड) Narendra Modi : डेहराडूनमध्ये शुक्रवारी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं वक्तव्य केलं. "माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल", असा दावा मोदींनी केला आहे.
५ वर्षांत १३ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. जर भाजपानं या निवडणुकांत विजय मिळवला तर पक्ष सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करेल. तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाच्या नुकत्याच झालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं हे विधान आलं आहे. "भारतानं गेल्या काही वर्षांत लक्षणीय विकास नोंदवला आहे. पूर्वी लोकसंख्येचा काही भाग वंचित होता, मात्र अवघ्या ५ वर्षांत १३ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत", असं मोदी म्हणाले.
'मेड इन इंडिया' प्रमाणे 'वेड इन इंडिया' चळवळ : काही दिवसांपूर्वी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी, विदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांना देशातच लग्न करण्याचं अपील केलं होतं. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं ते म्हणाले होते. आज उत्तराखंडमध्ये बोलताना त्यांनी त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला. "'मेड इन इंडिया' प्रमाणेच 'वेड इन इंडिया' चळवळ असावी, जेणेकरून डेस्टिनेशन वेडिंगमुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळू शकेल", असं मोदी म्हणाले.
'वोकल फॉर लोकल' आणि 'लोकल फॉर ग्लोबल' बना : गुंतवणूकदारांना उत्तराखंडच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपल्याला 'वोकल फॉर लोकल' आणि 'लोकल फॉर ग्लोबल' बनलं पाहिजे". राज्यात अनेक प्रकल्प पुढे जात आहेत. गावातील रस्त्यांचं काम सुरू आहे. लवकरच दिल्ली-डेहराडून एक्स्प्रेस वे सुरू होईल. ज्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांचा असेल, असं त्यांनी सांगितंलं. उत्तराखंडला देवभूमीची उपमा देऊन मोदी म्हणाले की, उत्तराखंडमध्ये गुंतवणूकदारांसाठी मोठी क्षमता आहे. राज्य सक्षमीकरणाचा एक नवीन ब्रँड बनणार आहे. येथे संस्कृती, वारसा, आयुर्वेद आणि योगामध्ये अनेक प्रगतीच्या शक्यता आहेत. या भूमीसाठी काहीतरी करण्याची संधी मिळणं हे आपलं भाग्यच असल्याचं ते म्हणाले.
हेही वाचा :