मुंबई : गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सात उमेदवार विजयी झाल्याने, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागालँडमधील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला आहे. राष्ट्रवादी आता सभागृहात विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे.
पाच जागा फार कमी फरकाने गमावल्या : राष्ट्रवादीचे ईशान्येचे सरचिटणीस नरेंद्र वर्मा म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षात ईशान्य भारतात आमच्या मेहनतीचे हे फळ आहे. मी गेल्या चार महिन्यांपासून नागालँडमध्ये फिरलो आणि विशेषत: राज्याच्या पूर्वेकडील भागांवर लक्ष केंद्रित केले. नागालँडच्या जनतेने आम्हाला त्यांची मते दिली आहेत. विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही आमच्या विधिमंडळ पक्षाची दोन दिवसांत बैठक घेणार आहोत. वर्मा पुढे म्हणाले की, 'नागालँडमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, तेव्हा त्यांच्या पक्षाने विरोधी गटाकडून सर्वाधिक जागा जिंकणे ही मोठी उपलब्धी आहे. आम्ही 12 जागा लढवल्या. त्यापैकी आम्ही सात जिंकलो. तर पाच जागा आम्ही फार कमी फरकाने गमावल्या.
आरपीआयला राज्यात मोठे यश : महाराष्ट्रातील आणखी एका पक्षाने नागालॅंडमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ने राज्यात दोन जागांवर विजय मिळवला आहे. आरपीआयचे विनोद निकाळजे यांच्याकडे पक्षाच्या ईशान्येकडील कामकाज सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाने राज्यात आठ जागा लढवल्या. त्यापैकी दोन जागा जिंकल्या. तर चार जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
म्हणून ईशान्येत राष्ट्रवादी मजबूत : शरद पवारांनी 1999 मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा दिवंगत पी. ए. संगमा यांनी त्यांना साथ दिली होती. संगमा यांनी 2013 मध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ची स्थापना केली तेव्हापर्यंत ईशान्येकडील पक्षाची सुत्रे हाताळली होती. या प्रदेशातील त्यांच्या प्रभावामुळे राष्ट्रवादीला मते मिळाली, ज्यामुळे पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यास मदत झाली. याशिवाय, शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री आणि प्रफुल्ल पटेल केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री असल्याने पक्षाला नागालँडमध्ये काही प्रमाणात पाय रोवण्यास यश मिळाले. पवार यांचे जवळचे मित्र आणि विद्यमान लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील हे 2013 ते 2018 या काळात सिक्कीमचे राज्यपाल होते.
राज्यात कोणाला किती मते मिळाली? : चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) राज्यात 2 जागा मिळाल्या आहेत. तर राज्यात चार अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत. नागा पीपल्स पार्टी दोन जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एनडीपीपी 32.33 टक्के मतांसह पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपला 18 टक्के मते मिळाले असून काँग्रेसची 3.54 टक्क्यांवर घसरण झाली आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूला एका जागेवर विजय मिळाला असून त्यांना 3.24 टक्के मते मिळाली आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे सर्व 6 जागांवर डिपॉझिट देखील जप्त झाले होते. भाजपने 20 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 12 जागांवर विजय मिळवला. काँग्रेस मात्र 18 जागा लढवून देखील एकही जागा जिंकू शकला नव्हता.