बंगळुरू Mysore Airport Name Dispute : कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसनं भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. आता तर म्हैसूर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजपा म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचं नाव देण्यास विरोध करत आहे. त्यामुळं या प्रकरणाला आता जातीय वळण लागण्याची शक्यता आहे. भाजपानं म्हैसूर विमानतळाला कृष्णराजा वडियार यांचं नाव देण्याची मागणी लाऊन धरली आहे.
हिवाळी अधिवेशनात पेटला मुद्दा : कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन म्हैसूर विमानतळाच्या नामकरणावरुन चांगलंच गाजलं. मंत्री प्रियांक खरगे यांनी नामकरणाचा प्रस्ताव विधिमंडळात मांडला होता. तो मुद्दा काँग्रेस आमदार प्रसाद अब्बैया यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. गृहनिर्माण मंत्री बी झेड जमीर अहमद खान यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यामुळं हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विमानतळाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन आता भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
म्हैसूर टायगर पदवी भाजपानं काढली : भाजपानं आपल्या सत्ता काळात टिपू एक्सप्रेसचं नाव बदलून ते वाडियार एक्सप्रेस ठेवलं होतं. त्यामुळं भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेस म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचं नाव देण्याचा घाट घालत आहे. भाजपाला शह देण्यासाठी विमानतळाला टिपू सुलतान नाव देण्यात येणार असल्याचं काँग्रेसमधील सुत्रांनी स्पष्ट केलं आहे. भाजपानं पाठ्यपुस्तकात टिपू सुलतानला म्हैसूर टायगर ही दिलेली पदवी काढून टाकली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राज्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घातली होती.
टिपू सुलतान जयंती काँग्रेस सरकारनं पुन्हा केली सुरू : कर्नाटकात भाजपा सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना काँग्रेस सरकारनं सत्तेत आल्यानंतर बदललं आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस सरकार म्हैसूर विमानतळाचं नामकरण टिपू सुलतान ठेण्याचा गंभीरपणानं विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि के शिवकुमार या मुद्द्यांवर अद्याप काहीच बोलले नाहीत. आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळं भाजपा हिंदू मतांचं ध्रुविकरण करण्यासाठी या मुद्द्यांचा वापर करेल, असं काँग्रेसमधील नेत्यांचं मत आहे.
कृष्णराजा वडियार यांचं नाव देण्याची मागणी : म्हैसूर विमानतळाला कृष्णराजा वडियार यांचं नाव देण्याची मागणी भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी केली. टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता.
हेही वाचा :
- Rahul Gandhi Will Become PM: राहुल गांधी होणार देशाचे पंतप्रधान.. कर्नाटकातल्या संतांनी दिले आशीर्वाद..
- Karnataka Budget 2023 : सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज सादर करणार अर्थसंकल्प, जाहीरनाम्यातील वचनांची करणार पूर्तता?
- हिंदू हा शब्द पर्शियातून आला तो भारतीय नाही; कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य