बिजनौर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशात राम मंदिर बांधण्यासाठी देणगी दिल्याने एका मुस्लिम कुटुंबावर हल्ला करण्यात आला. पीडित कुटुंबीय जेव्हा या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा पोलिसांनी आरोपींविरोधात कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार लखनऊला जाऊन पोलीस महासंचालकांकडे करणार असल्याची माहिती मुस्लिम नेते मिसाल मेहंदी यांनी दिली आहे. तसलीम फातिमा असे पीडित महिलेचे नाव आहे.
काय आहे प्रकरण -
७ मार्च रोजी बिजनौरच्या नहटौर भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी भाषण केले. त्यानंतर या पीडित कुटुंबाने अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिरासाठी २१, ८२१ रुपयाची देणगी दिली. यानंतर काही लोकांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप तसलीम फातिमा यांनी केला आहे. दुसरा एक गट तसलीम फातिमा यांनी देणगी दिल्याने नाराज होता, त्यामुळे त्यांनी मारहाण केली. या घटनेची तक्रार पीडित कुटुंबाने नहटौर पोलीस स्टेशनमध्ये केली. मात्र, पोलिसांनी आरोपींवर कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे प्रसारक मिसाल मेहंदी यांनी आरोप केला आहे, की काही मुस्लिम गट या कुटुंबावर अश्लाघ्य टिप्पणी करत असून सोशल मीडियावरून धमकी देत आहे. पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याने या प्रकरणाची तक्रार लखनऊला जाऊन पोलीस महासंचालकांकडे करणार असल्याची माहिती मुस्लिम नेते मिसाल मेहंदी यांनी दिली आहे.
हेही वाचा - पश्चिम बंगालमध्ये भाजपाने सत्तेचा गैरवापर केला - शरद पवार