मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जगातील अनेक देशांनी ऑक्सिजन साहित्यासह वैद्यकीय साधनसामुग्रीच्या रुपात सुरू केलेला मदतीचा ओघ सुरूच आहे. आत्तापर्यंत तब्बल २० देशांतून अवघ्या १८ दिवसांत ११० विमान उड्डाणांतून ३८७ टन वैद्यकीय सामग्री मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाठवण्यात आली आहे.
सीएसएमआयएमची उत्कृष्ट कामगिरी -
कोरोना काळात गेल्या एका वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करत, प्रवाशांना सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवास घडून आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कौतूकास्पद पद कामगिरी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोविड रुग्नाची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत असून मोठ्या प्रमाणात राज्यातील रुग्णालयात औषधींचा तुटवडा जाणवत होता. या संकट काळात अनेक देशांनी भारतात ऑक्सिजन आणि वैद्यकीय साधनसामुग्रीचा पाठवायला सुरुवात केली होती. मात्र या संकटकाळात ही वैद्यकीय सामुग्री देशात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. २६ एप्रिल ते १४ मे २०२१ या कालावधीत ११० विमानाच्या उड्डाणातून ३८७
टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक केली आहे. ज्यामध्ये १७ हजार ७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, ३ लाख १९ हजार ८०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि १ लाख १३ हजार ९०० पेक्षा जास्त इटोलीझुमॅब इंजेक्शनच्या समावेश आहे.
जगभरातील 20 देशातून आली मदत-
सीएसएमआयएम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ११० विमान उड्डाणातून ३८७ टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक जगभरातील 20 देशातून आली होती. ज्यामध्ये सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड्स, इंडोनेशिया, चीन, स्कॉटलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंग्लंड, फ्रान्स, पापुआ न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया, पोलंड, यासह २० देशांचा समावेश आहे. तसेच तुर्की, जर्मनी, दुबई, दक्षिण आफ्रिका, थायलंड, कॅलिफोर्निया आणि हाँगकाँग. सीएसएमआयएने मुंबईत अत्यावश्यक औषधी वस्तूंच्या वाहतुकीसाठी अंदाजे ११० आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सहकार्य केले आहे.