खरगोन - महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मध्य प्रदेशच्या काही कामगारांना ओलिस ठेवल्याची घटना समोर आली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांच्या मदतीने 19 कामगारांची सुटका केली. संबधित ठेकेदार धनंजयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील बेदियामधील कामगार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी आले होते. ठेकेदाराने 20 कामगारांना दरमहा 25 हजार रुपये दराने एका महिन्याच्या बोलीवर मजुरीसाठी आणले होते. मात्र, एक महिना झाल्यानंतरही त्यांना ठेकेदाराने ओलिस ठेवले. तसेच त्यांच्यावर आत्याचारही केला. काही जण ठेकेदाराच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. तर गणेश नावाच्या कामगाराला ठेकेदाराने पकडले. त्यानंतर त्याला मारहाण केली आणि चार महिने ओलिस ठेवले.
एका स्वयंसेवी संस्थेने या मजुरांची माहिती काढली आणि पोलिसांच्या मदतीने त्यांची सुटका केली. संस्थेच्या यास्मीन खान यांनी सांगितले की, या घटनेची त्यांना माध्यमातून माहिती मिळाली होती. यावर त्यांनी पोलीस अधिक्षकाकडे तक्रार केली. त्यांच्याशी बोलल्यानंतर संस्थेच्या लोकांनी महाराष्ट्रातील बीड पोलीस स्टेशन प्रभारींची भेट घेतली आणि ठेकेदार धनंजय यांच्याविरोधात कलम 370 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर गणेश या कामगारासह 19 जणांची सुटका केली.
कोल्हापूरातही ठेवलं होतं मजुरांना ओलिस -
कोल्हापूरमध्येही मजुरांना ओलिस ठेवल्याची घटना समोर आली होती. नुकतच कामगार विभागाने त्यांची सूटका केली आहे. मध्य प्रदेशच्या दमोह येथून जवळपास 14 मजूर आपल्या 5 मुलांसह कामाच्या शोधात महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात आले होते. मात्र, ठेकेदाराने त्यांना ओलिस ठेवले. तसेच जबरदस्तीने मारहाण करून अतिरिक्त कामे करून घेतली. या मजुरांमध्ये 8 पुरुष, 6 महिला आणि 5 मुले होती.