सिधी(मध्य प्रदेश) - पतीने पत्नीसाठी डोंगर फोडून विहीर खोदली (Mountain Man) आहे. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील हा प्रकार आहे. पाण्यासाठी पत्नीची होणारी वणवण पाहून पतीने चक्क डोंगर फोडून त्यात विहीर तयार केली आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत जे पत्नीसाठी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात. शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला, तर बिहारच्या दशरथ मांझीने पत्नीसाठी डोंगर फोडून रस्ता तयार केला.
हेही वाचा - पाण्याच्या थेंबासाठी ग्रामस्थ झाले दशरथ मांझी, लोकवर्गणीतून विहिरीचे खोदकाम
पठ्ठ्याने पत्नीसाठी खोदली डोंगरावर विहीर - सिधी जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर असलेल्या सिहावळ येथील पतीने पत्नीसाठी डोंगर फोडून विहीर तयार केली आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक आजही पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पतीने खोदलेल्या विहीरीला सध्या काही प्रमाणात पाणी लागले आहे.
डोंगरावर विहीर खोदली : ४० वर्षीय हरि सिंह यांनी सांगितले की, पत्नी सियावती हिला पाण्यासाठी खूप दूर जावे लागत होते. पत्नीला दोन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे मी खडकांनी वेढलेला डोंगर फोडून 60 फूट खोल व 20 फूट रुंद विहीर खोदली आहे. या विहीरीत थोडे पाणी लागले आहे, मात्र जोपर्यंत जास्ती पाणी विहीरीत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ही विहीर खोदण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे हरि सिंह यांनी सांगितले. तीन वर्षांपासून हे काम अव्याहतपणे सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कुटुंबाच्या मदतीने खोदली विहीर : ३ वर्षांपासून त्यांची पत्नी सियावती आणि दोन मुले व एक मूल ही विहीर खोदण्याच्या कामात त्यांना मदत करत आहेत. हरी सिंह यांनी सांगितले की, सुरुवातीला हे काम खूप अवघड वाटले, कारण संपूर्ण दगड फोडावा लागला. मातीचा एक थरही नव्हता. अशा परिस्थितीत खूप अडचणींचा सामना करावा लागला. आता या विहीरीला काही प्रमाणात पाणी लागले असून, जोपर्यंत जास्ती प्रमाणात पाणी मिळत नाही तोपर्यंत विहीर खोदली जाणार असल्याचे यावेळी हरि सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा - दशरथ मांझी; जगाला खरं प्रेम शिकवणारा 'माऊंटन मॅन'