नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम-किसान योजनेच्या आठव्या टप्प्याचे उद्घाटन केले. या टप्प्यामध्ये १९ हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) आजच्या टप्प्यातून ९.५ कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय कृषीमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आतापर्यंत १.१५ लाख कोटी रुपये दिले..
पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते. दोन-दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येते. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण १.१५ लाख कोटी रुपये शेतकरी कुटुंबांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्मीर आणि अंदमान निकोबार या पाच राज्यांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
काय आहे शेतकरी सन्मान निधी योजना?
पीएम किसान योजना अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. या योजनेचं वार्षिक बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतकं आहे.
पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग -
शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.
हेही वाचा : येत्या पाच महिन्यांत २१६ कोटी कोरोना लशींचे डोस होणार उपलब्ध- केंद्र सरकार