बंगळुरु : देशभरात दररोज अनेक मोबाईलची चोरीची घटना घडत असतात. मोबाईल चोरी करण्याचा सुळसुळाट आपल्याला देशातील सर्व राज्यात पाहायला मिळतो. या मोबाईल चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चोरीच्या मोबाईलचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्रीय गृह विभागाकडून कडक पावले उचलली जात आहे. चोरीच्या मोबाईलचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्रीय गृह विभाग आणि दूरसंचार विभाग यांच्या सहकार्याने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) उपक्रम राबवण्यात येत आहे. देशभरात हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. सीईआयआरच्या अंमलबजावणीमुळे देशात 6 लाखांहून अधिक चोरीचे मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत, तर 2 लाख 69 हजार 840 मोबाईल सापडले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या राज्यातील सर्वाधिक मोबाईल ब्लॉक : यावेळी पोलिसांनी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरमार्फत देशातील इतर राज्यात किती मोबाईल ब्लॉक करण्यात आले याची माहिती दिली आहे. दिल्लीत सर्वाधिक मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकाचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 82 हजार मोबाईल ब्लॉक करण्यात आली आहेत.
किती मोबाईल झाले ब्लॉक : दरम्यान, एकट्या दिल्लीमध्ये 3 लाख 51 हजार मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 2 लाख 4 हजार 107 मोबाईलचा छडा लावण्यात आला आहे. याचबरोबर पोलिसांनी 1 हजार 318 जणांना त्यांचा मोबाईल मूळ मालकाकडे सुपूर्त केला आहे. कर्नाटकात 71 हजार 911 मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 60 हजार 133 मूळ मालकांना त्यांचा मोबाईल परत मिळाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्रात 82 हजार 326 मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 31 हजार 314 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतरग तेलंगणामध्ये 38 हजार 921 मोबाईल फोन चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी 5 हजार 278 मोबाईल सापडले आहेत. तर पोलिसांनी 2 हजार 777 मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत.
बंगळुरूमध्ये किती आढळले?: दिल्ली आणि मुंबईनंतर बेंगळुरू शहर पोलिसांनी CEIR उपक्रम चालू केला. मे अखेरपर्यंत बंगळुरूमधील २२ हजार ५८१ लोकांनी पोर्टलवर मोबाईल चोरीची माहिती अपलोड केली होती. यापैकी 3 हजार 882 मोबाईल सापडले आहेत. तर 2 हजार 252 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी 1 हजार 524 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
काय आहे CEIR उपक्रम : सायबर, इकॉनॉमिक आणि नार्कोटिक्स (CEN) पोलीस ठाण्याचे निरीक्षक हे CEIR योजनेचे नोडल अधिकारी आहेत. ई-लॉस्टमध्ये रेकॉर्ड केलेला मोबाईल चोरीचा डेटा CEIR वर अपलोड केला जातो. मोबाईल चोरी झाल्यास तो ब्लॉक करण्यासाठी आणि परत शोधून काढण्यासाठी हा उपक्रम आधी दिल्ली आणि नंतर मुंबईत चालू करण्यात आला होता. जर तुमचा मोबाईल हरवला तर किंवा चोरीला गेला तर पोलीस ई-लॉस्ट अॅपद्वारे किंवा सीईआयआर पोर्टलद्वारे पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलीस तो मोबाईल ब्लॉक करतील. मात्र त्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. जर तुम्हाला डुप्लिकेट नंबर मिळाला आणि तोच नंबर दिला तर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तुम्ही तोच नंबर टाकल्यास, तुम्ही तो अनब्लॉक करू शकता.पोलिसांशिवाय मोबाईलचा मालकही मोबाईल अनब्लॉक करू शकतो. एकदा ब्लॉक केला तरी मोबाईल कोणाला मिळाला तरी उपयोग होणार नाही. चोराने सिम फेकून देऊन नवीन सिम घेतले तरी पोलिसांना संदेश जात असतो. मोबाईल चालत नसल्याने चोरीला गेलेला मोबाईल काही उपयोगाचा नसल्याची खात्री एकदा चोरांना पटली की ते हळूहळू त्यांची गुन्हेगारी कमी करतात, असे पोलिसांनी सांगितले.
अनब्लॉक करण्याचा पर्याय : चोरीला गेलेला मोबाईल सापडल्यास ब्लॉक केलेला मोबाईल अनब्लॉक कसा करणार. मोबाईल अनब्लॉक करायचा असेल तर www.ceir.gov.in पोर्टलवर जा आणि अनब्लॉक करा. पोलिसांकडे याचिका सादर केल्यास, नोडल अधिकारी मोबाईल फोन वापरण्यास योग्य करतील.