गुवाहाटी(आसाम) : आसाम विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळी ९ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपाल गुलापचंद कटारिया यांनी आसाम सरकारच्या विकासकामांवर प्रकाश टाकणारे भाषण केले.
अधिवेशनात गदारोळ - अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या श्वानाच्या वक्तव्यावरुन सभागृहात वाद निर्माण झाला. राज्यपालांच्या भाषणाला विरोधी काँग्रेसचे आमदार, श्वानाच्या मांसाच्या वादावर प्रश्न उपस्थित करणारे रायजोर डोलचे एकमेव आमदार अखिल गोगोई उपस्थित होते. राज्यपालांनी आपल्या भाषणात या श्वानाच्या मांसाच्या मुद्द्याचा उल्लेख केला नाही, असा आरोप त्यांनी केला.
राज्यपालांचे भाषण अर्धवट : पुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, असे राज्यपाल म्हणाले. मात्र, याचवेळी विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे राज्यपालांना 17 मिनिटांत आपले भाषण अर्धवट संपवावे लागले.
आसाममधील जनता दुखावली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सहभागी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नुकतेच महाराष्ट्र विधानसभेत आसाममधील लोक कुत्र्याचे मांस खातात असे म्हटले होते. त्यावरुन विधानसभेत एकच गदारोळ झाला.'आसामचे लोक श्वानाचे मांस खातात. महाराष्ट्रातील कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावरील कुत्रे आसाममध्ये पाठवा. आसाममध्ये कुत्र्याच्या मांसाला मागणी आहे असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यामुळे आसाममधील जनता दुखावली गेली आहे. महाराष्ट्राचे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
16 मार्चला अर्थसंकल्प सादर : आसामचे नवनियुक्त राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी पहिल्यांदाच आसाम विधानसभेला संबोधित केले. आपल्या भाषणात, राज्यपालांनी लचित बारफुकनच्या 400 व्या जयंती आणि आसामच्या 600 वर्षांच्या अहोम साम्राज्याच्या पराक्रमाचा उल्लेख केला. आसाम सरकारने आयोजित केलेल्या लचित बारफुकन या विषयावरील निबंध स्पर्धेचा आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या स्पर्धेच्या प्रवेशाचाही त्यांनी उल्लेख केला. बिहूचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्याच्या आसाम सरकारच्या तयारीचाही राज्यपालांनी उल्लेख केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 3 विधेयके मांडण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 5 एप्रिलपर्यंत चालणार असुन एकूण 14 दिवस सभागृह सुरु राहीत. तर 16 मार्चला अर्थमंत्री 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपालांच्या भाषणावर 13 मार्चला चर्चा होईल.