श्रीनगर - काल (शुक्रवारी) पाकव्याप्त काश्मीरमधून एक अल्पवयीन मुलगा भारतीय सीमारेषा ओलांडून आला होता. अली हैदर (वय १४), असे या मुलाचे नाव आहे. सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने ताब्यात घेतलेल्या या मुलाला त्याच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पूँछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश अंग्राल यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी अजोटे गावाजवळील बटार नल्लाह परिसरातून सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने अली हैदरला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता, तो पाकव्याप्त काश्मीरच्या मीरपूरचा रहिवासी असल्याचे समोर आले. त्याने चुकून सीमारेषा पार केली होती. केलेल्या चौकशीमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे त्याला पुन्हा त्याच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, अली हैदरने जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत. सुरक्षा दलाने त्याला जेवण, कपडे आणि बूट दिले. त्यांनी मला अतिशय चांगली वागणूक दिली, असे हैदरने सांगितले.