अहमदाबाद- कोरोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण वाढताना उपचार घेत असलेले रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांच्यावरील मानसिक तणाव वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी सुरतमधील अटल कोविड केअर सेंटरमध्ये चक्क मिकी आणि माऊस पोहोचले. त्यांनी कोरोनाबाधितांची विचारपूस केली. एवढेच नाही तर, त्यांच्याबरोबर नृत्यही केले आहे.
कोविड रुग्णालय असलेल्या अटल संवेदनामध्ये अचानक मिकी माऊस आणि मिनी माऊस दाखल झाले. ते पाहून डॉक्टर, कोरोनाबाधित आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटले. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. मिकी माऊस आणि मिनी माऊस यांनी कोरोनाबाधितांबरोबर नृत्य करून त्यांचा मानसिक तणाव दूर केला.
हेही वाचा-पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राची चार सदस्यीय समिती आढावा घेण्यासाठी रवाना
सकस आहारासह फळांचे कोविड रुग्णालयात वाटप-
अटल कोविड संवेदना केंद्रामधील इन्चार्ज कैलाश सोळंकी म्हणाले, की हेल्पिंग हँड्स या संस्थेच्या मदतीने तरुणांनी कोरोना सेंटरमध्ये तणावमुक्तीचे काम केले आहे. फेज २ संघटनेने आमच्याशी संपर्क केला होता. त्यांनी रुग्णांना आनंदित करण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणांनी कोरोनाबाधित आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सकस आहार आणि फळांचे वाटपही केले आहे.
हेही वाचा-दिल्लीमध्ये पेट्रोल २५, तर डिझेल ३० पैशांनी महागले!
वेदना विसरल्याची रुग्णांची प्रतिक्रिया-
मिकी आणि मिनी माऊसने नृत्य केल्याने रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी खूश झाले. रुग्णांनी म्हटले, की आम्ही त्यांच्याबरोबर खूप मस्ती केली आहे. आम्ही सर्व वेदना विसरून गेलो आहोत. त्यांच्या भेटीने दिलासा मिळाला आहे. आम्हाला अधिक उर्जा मिळाली आहे.
दरम्यान, कोविड सेंटरमध्ये तणावमुक्ती करण्यासाठी यापूर्वीही डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नृत्य केल्याचे व्हायरल व्हिडिओ झाले होते.