नवी दिल्ली : देशातील पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना याविरोधात कठोर कारवाईचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना दिले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे.
पर्यटनस्थळांवरील गर्दीवर नाराजी
देशातील काही पर्यटनस्थळे विशेषतः हिल स्टेशन्सवर होणाऱ्या गर्दीवर मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असे हिल स्टेशन्स, मार्केट, परिवहन व्यवस्थेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात नसल्याचे केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात अधोरेखित केले आहे. देशात कोरोना लसीकरणाचा आलेख उंचावत असला तरी कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
निर्बंध शिथील करताना काळजी गरजेची
कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असतानाच राज्य सरकारे पुन्हा आर्थिक हालचाली सुरू करत आहेत. मात्र निर्बंध शिथील करण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. कमी पॉझिटिव्हिटीच्या काळातच कोरोनाला लगाम लावण्यासाठीचे उपाय वाढविणे गरजेचे आहे जेणेकरून पुन्हा रुग्णसंख्या वाढणार नाही असे ते म्हणाले. मात्र याचे पालन होताना दिसत नाही. यामुळे आर-फॅक्टर म्हणजेच रिप्रॉडक्शन नंबर वाढण्याची चिंता असल्याचे भल्ला म्हणाले.
नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
हे लक्षात घेता कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे याकडे प्राधिकरणांनी लक्ष देण्याची गरज आहे असे भल्ला यांनी या पत्रात म्हटले आहे. जिथेही अशा नियमांचे उल्लंघन होत आहे अशा संस्थांवर कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. राज्यांनी जिल्ह्यांना कठोर निर्देश जारी करावे अशा सूचना त्यांनी या पत्रातून केल्या आहेत.
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका...एम्सकडून तयारी सुरू