नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा खटला लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. ए.पी. सिंह यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. ते म्हणाले की, 'मला असे खटले लढण्यात रस आहे, जिथे मला वाटते की कोणालातरी कट रचून गोवण्यात आले आहे'. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाबाबत बोलताना ते म्हणाले की, 'आजकाल अशा अनेक खोट्या केसेस समोर येतात. आता देशात सीता, सावित्रीसारख्या महिलांची संख्या कमी होत आहे. तर सनी लिओनीसारख्या महिला वाढत आहेत'. सिंह म्हणाले की, 'ब्रिजभूषण सिंह यांना कट करून या प्रकरणात गोवण्यात आले आहे'.
'पैलवानांना चाचणीला सामोरे जायचे नाही' : ए पी सिंह पुढे म्हणाले की, 'आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंना चाचणीशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायचे होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी असा नियम केला आहे की जो खेळाडू प्रथम जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळेल, त्यालाचा आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये पाठवले जाईल. या पैलवानांचे वय उलटले आहे. आता त्यांना चाचणीला सामोरे जायचे नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कट रचण्यात आला आहे', असे ते म्हणाले.
एपी सिंह यांनी निर्भया आणि हाथरसची केसही लढवली आहे : वकील एपी सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी त्यांनी गायत्री परिवार मिशनचे संस्थापक श्रीराम शर्मा आचार्य आणि भाजपचे माजी खासदार स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाचे खटले लढवले आहेत. ते म्हणाले की, त्यांनी या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. ब्रिजभूषण यांची बाजू घेत एपी सिंह यांनी हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचे उदाहरण दिले. हाथरस घटनेतही एका आरोपीसह आणखी तीन निष्पाप मुलांना गोवण्यात आल्याचे ते म्हणाले. मी पुढे जाऊन त्यांचा खटला लढवला आणि त्या प्रकरणात न्यायालयाने तीन मुलांची निर्दोष मुक्तता केली, असे ते म्हणाले. एपी सिंह यांनी निर्भया प्रकरणातील आरोपींच्या वतीनेही वकिली केली आहे.
'प्रसारमाध्यमांनी ब्रिजभूषण यांना खलनायक बनवले' : एपी सिंह म्हणाले की, अनेक प्रकरणांमध्ये इतकी मीडिया ट्रायल होते की, आरोपपत्र सादर होण्यापूर्वीच मीडियाचे लोक निर्णय देणे सुरू करतात. ब्रिजभूषण यांच्या प्रकरणातही सहा महिने सतत मीडिया ट्रायल सुरू असून, पोलिसांनी 15 जून रोजी आरोपपत्र दाखल केले. ते म्हणाले की, ज्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली असेल अशा प्रकरणांमध्ये नियमित जामीन द्यावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा लेखी निकाल आहे. त्याच्याआधारे ब्रिजभूषण सिंह यांना जामीन देण्यात आला आहे. आता या प्रकरणातील आरोपपत्रावर चर्चा होणार आहे. या प्रकरणात अतिशयोक्ती आणि विपर्यास करून अनेक गोष्टी मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विनयभंगाच्या प्रकरणाला लैंगिक शोषण असे नाव देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा :