लखनऊ : प्रेमाला वय नसतं असं लोक म्हणतात. प्रेमात सर्वकाही मान्य असतं अशा अर्थाची एक इंग्रजी म्हणही आहे. तुम्ही हे केवळ ऐकलं असेल, मात्र उत्तर प्रदेशच्या मथुरेमधील एका महिलेने हे खरं करुन दाखवलं आहे. सात मुलांची आई असलेली ही महिला, आपल्या प्रेमीसोबत पळून गेली आहे. यानंतर तिचा हतबल पती मात्र न्याय मागण्यासाटी पोलिसांकडे गेला आहे. मात्र, घटनेला २० दिवस होऊन गेल्यानंतरही पोलिसांना या महिलेला शोधण्यात यश आलेले नाही.
जिल्ह्याच्या डंगोली गावातील महेंद्रचे लग्न फूलवतीसोबत झाले होते. लग्नानंतर २० वर्षांमध्ये या दाम्पत्याला ७ मुले झाली. मात्र, या सर्व मुलांना वाऱ्यावर सोडून ती गावातील एका साधूसोबत पळून गेली. १७ मे रोजी तिच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. मात्र तरीही तिचा शोध न लागल्यामुळे आज (सोमवार) तो आपल्या सहा मुलांसह एसएसपी कार्यालयात पोहोचला. याठिकाणी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो आपल्या घरी परत गेला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..
आपली पत्नी गावातील एका साधूसोबत पळून गेल्याची तक्रार महेंद्रने केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या साधूला ताब्यातही घेतले होते. मात्र, त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. तसेच, त्याच्याकडे कोणतीही माहितीदेखील मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन या साधूला सोडून दिले. पोलीस सध्या महिलेचा शोध घेत आहेत.
हेही वाचा : ट्रॅक्टरने चिरडून गाईची हत्या; सीसीटीव्ही व्हिडिओच्या मदतीने आरोपीला अटक