मथुरा: उत्तर प्रदेशातील तीर्थक्षेत्र असलेल्या मथुरेतील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिराजवळ भिंतीखाली दबून 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यात नागरिक पळत असतानाचे दृश्य दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
तीनजण कानपूरचे : दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. तर जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका न पोहोचल्याने जखमींना तातडीने ई-रिक्षाच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांपैकी तिघेजण कानपूरचे रहिवासी होते. ते दर्शनासाठी आले होते. गीता कश्यप,अरविंद कुमार, रश्मी गुप्ता, अंजू मुगी (रा.वृंदावन) अशी मृतांची नावे आहेत. तर एकाची अद्याप ओळख पटू शकली नाही.
सीसीटीव्ही फुटेज : दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी लोकांच्या ओरडण्यामुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी पोलिसांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढले. या फुटेजमध्ये इमारतीची भिंत भाविकांच्या अंगावर पडल्याचे दिसत आहे. भिंत कोसळल्यामुळे काही वाहनांचेदेखील नुकसान झाले आहे.
काय म्हणाले स्थानिक : दुसायत मोहल्ला येथे ही दुर्घटनाग्रस्त इमारत ही बांके बिहारी मंदिरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, ही इमारत आधीच जीर्ण झाली होती. पावसामुळे इमारतीची अवस्था आणखीनच खराब झाली होती. मंगळवारी सायंकाळी अचानक इमारतीची भिंत कोसळल्याने धोकादायक इमातरतीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर दुःख व्यक्त करण्यात आल्याचा संदेश पोस्ट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री योगी यांनी दुघर्टनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवाकडे प्रार्थना केली. याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत.
हेही वाचा