गुवाहाटी (आसाम) : दिब्रुगड विद्यापीठातील रॅगिंग (Dibrugarh University ragging) प्रकरणाचा कथित मास्टरमाइंड राहुल चेत्री (Mastermind of Dibrugarh University ragging) 10 दिवस फरार झाल्यानंतर आज सकाळी पोलिसांसमोर शरण आला. सोमवारी पहाटे तिनसुकिया जिल्ह्यातील लेखपानी पोलिस स्टेशनमध्ये त्याने आत्मसमर्पण केले. त्याला तात्काळ दिब्रुगड सदर पोलीस ठाण्यात हलवण्यात आले असून तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज दुपारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे.
आत्महत्येच्या प्रयत्ना नंतर घटना उघड : 24 नोव्हेंबरच्या रात्री विद्यार्थी आनंद सरमा याने दिब्रुगढ विद्यापीठाच्या पीएनजीबी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही रॅगिंगची दुर्दैवी घटना उघडकीस आली. आनंद सरमाच्या कुटुंबीयांनी रॅगिंगविरोधात दिब्रुगड पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात 7 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दुसरीकडे, विद्यापीठ प्राधिकरणाने या घटनेत सहभागी असलेल्या 18 विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे.
काय आहे प्रकरण : रॅगिंगदरम्यान होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळापासून वाचण्यासाठी दिब्रुगड विद्यापीठातील विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. रविवार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 24 नोव्हेंबरच्या रात्री पासून एम. कॉम.च्या पहिल्या सेमिस्टरचा विद्यार्थी आनंद सरमाचा छळ सकाळपर्यंत सुरूच होता. या छळापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. घटनेसंदर्भात विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये शनिवारी सायंकाळी 4.30 वाजल्यापासून पद्मनाथ गोहेन बरुआ वसतिगृहात विद्यार्थी आनंद सरमा याचे मानसिक आणि शारीरिक शोषण करण्यात आल्याचा उल्लेख आहे.