हैदराबाद - भूपलपल्ली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले मराठी अधिकारी डॉ. संग्रामसिंह पाटील यांनी नुकतीच दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील गावांना भेट दिली. जिल्ह्यातील कायदा सुवस्था सुरळीत राखण्यासोबतच दुर्गम भागातील रहिवाशांच्या अडीअडचणी दूर करण्याचे काम डॉ. पाटील सातत्याने करत असतात. त्यांनी भूपलपल्ली जिल्ह्यातील इंचमपल्ली आणि नीलमपल्ली या दोन सीमावर्तीय आणि दुर्गम भागातील गावांना भेटी दिल्या. यावेळी स्थानिकांशी संवाद साधून त्यांनी प्रति घर एक छत्री आणि फळांची रोपे वाटप केली. तसेच तरुणांच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे आश्वासन देत कोरोना काळात आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे.
तेलंगणातील भूपलपल्ली जिल्ह्याच्या सीमा या महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांना लागून आहेत. सीमावर्तीय भागात नक्षलवाद्यांचा वावर असल्याने या दुर्गम भागातील तरुणाई नक्षली कारवायांच्या संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने ग्रामस्थांनी समाजविरोधी कारवाया करणारे किंवा अनोळखी व्यक्तींना आश्रय न देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संग्रामसिंह पाटील यांनी केले आहे. तसेच कसलीही गरज लागल्यास पोलीस गावकऱ्यांना ढालीप्रमाणे संरक्षण देतील, असेही आश्वासन डॉ. संग्रामसिंह पाटील यांनी या ग्रामस्थांना दिले आहे.
ग्रामसभेचे आयोजन; आरोग्याविषयक सूचना फळझाडांच्या रोपांचे वाटप-
पोलीस अधीक्षक पाटील यांनी महाराष्ट्र, तेंलगाणा आणि छत्तीसगड या तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या इंचमपल्ली आणि नीलमपल्ली या दोन गावांना भेटी दिल्या. नक्षलग्रस्त असलेल्या या गावात मूक्तसंचार करत पाटील यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली, यावेळी त्यांनी दोन्ही गावांची संयुक्तपणे एक ग्रामसभा आयोजित केली. त्यावेळी ग्रामस्थांशी मोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कोरोना विषाणूची बाधा होण्याचा धोका असल्याने मास्कच वापर करणे, गर्दी न करता सामाजिक अंतर राखणे गरजेचे असल्याचेही डॉक्टर पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले.
तरुणांच्या शिक्षणासाठी ग्रंथालय उपलब्ध करून देणार - डॉ. पाटील
या दोन्ही गावांचा नक्षलग्रस्त भागाशी संपर्क असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. पाटील यांनी यावेळी येथील युवा वर्गाच्या भविष्याचाही विचार व्यक्त करून दाखवला. येथील तरुण काही समाजविरोधी चळवळींकडे आकर्षित होण्याची भीती व्यक्त करत तरुणांनी आपल्या प्रगतीचा, भविष्याचा विचार करावा. त्यासाठी शिक्षणाला महत्व द्यावे, निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करावा, खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी तरुणांना केले. पोलीस दलाच्या वतीने येथील तरुणांना व्हॉलीबॉल आणि इतर खेळाचे साहित्यही यावेळी भेट देण्यात आले. तरुण विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी शिक्षणाच्या दृष्टीने वेगवेगळे साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी एक ग्रंथालय सुरू करण्याचे आश्वासनही अधीक्षक पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.
अनोखळींना आश्रय देऊ नका-
ग्रामसभा घेत असताना पोलीस अधीक्षक पाटील यांनी समाजविरोधी घातक कारवाया करणारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपल्या घरात आश्रय देऊ नका, असे आवाहन येथील ग्रामस्थांना केले आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज पडलल्यास पोलीस तुमच्या मदतीसाठी सज्ज आहेत. तुमच्यासाठी पोलीस सुरक्षेची ढाल उभी करतील असेही आश्वासन पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले आहे.
मराठी अधिकारी असलेले डॉ. संग्राहमसिंह पाटील यांनी येथील आदिवासी पाड्याच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखत असताना, येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध भागात आरोग्याचे कॅम्पचे आयोजन करून उपचार केले आहेत. समाजसेवेचे व्रत घेतेलेल्या पाटील यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जनतेच्या आरोग्य हितासाठी आपल्या खाकी वर्दीसोबत वैद्यकीय क्षेत्राचा पांढराकोटही वेळोवेळी अंगावर चढवल्याचा पाहायाला मिळाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची छाप भूपलपल्ली आणि मुलुगू या दोन्ही जिल्ह्यात दिसून येते.