नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीची उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी आपल्या राजीनाम्यात म्हटले की, त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. त्यांनी 8 वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप दुर्दैवी असून तपास यंत्रणांनी मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मी जनतेपैकीच एक आहे. माझ्यावरील आरोप निराधार आणि खोटे आहेत हे देवाला माहीत आहे. हे आरोप म्हणजे भ्याड आणि दुबळेपणाचे लक्षण आहे.
'केजरीवाल हे लक्ष आहेत' : मनीष सिसोदिया यांनी केजरीवाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, काही लोक केजरीवाल यांच्या सत्याच्या राजकारणाला घाबरतात. त्यांचे लक्ष्य मी नाही तर अरविंद केजरीवाल हे आहेत. सिसोदिया म्हणाले की, आज केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देशातील जनता केजरीवाल यांच्याकडे दूरदृष्टी असलेला नेता म्हणून पाहत आहे. त्यांनी पत्रात पुढे लिहिले आहे की, आज अरविंद केजरीवाल हे गरिबी, बेरोजगारी, आर्थिक संकट, महागाई आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्यांना तोंड देत असलेल्या देशभरातील कोट्यवधी लोकांसाठी आशेचे नाव आहे.
सिसोदियांना पाच दिवसांची कोठडी : मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अबकारी धोरण प्रकरणात अटकेला आव्हान देणाऱ्या सिसोदिया यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतर लगेचच मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, आता त्यांचा राजीनामा दिल्लीचे नायब राज्यपाल वीके सक्सेना यांच्याकडे पाठवला जाणार आहे. विशेष म्हणजे, दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती, त्यानंतर सोमवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
न्यायालयात सुनावणी जारी : सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाबाबत दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण 15 जणांची नावे आहेत. या सोबतच ईडीनेही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत त्यांनी 9 जणांना अटक केली असून सीबीआयने 4 जणांना अटक केली आहे. ईडी आणि सीबीआयने आपापली प्राथमिक आरोपपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी जारी आहे. जनसंपर्क कंपनी चालवणारे विजय नायर, विनय बाबू, समीर महेंद्रू, शरथ रेड्डी, अभिषेक बोईनापल्ली आणि अमित अरोरा यांना अटक करण्यात आली आहे.